घराचं आंगण अगदी कुणाच्या खिजगीणतीतही नसलेला विषय...पण तरी यावर लिहावंसं वाटतंय...घराला आंगण असणारे किती भाग्यशाली असतात हे पुण्या मुंबईत फ्लॅट राहणाऱ्याला विचारा? हा लेख लिहीत असताना कदाचित मी त्यांच्या दुखऱ्या भागावरील खपल्याही काढत असेल याबद्दल क्षमस्व!!! पर्यायाने माझ्याही...
आंगण म्हटलं की एक डोळ्यासमोर येणारी प्रतिकृती म्हणजे गोड अस तुळशी वृंदावन त्याच्या खाली खोबणीत पणती लावायला छोटीशी जागा, त्यावर विठ्ठलरखुमाईच चित्र, आणि त्या तुळशीच्या मातीत रोज खोसलेल्या उदबत्त्यांचा खच, छोटीशी रांगोळी, कडेने तारेच कंपाउंड, कोपऱ्यात ठेवलेला पाणी तापवायचा बंब व मांडलेली चूल, कुठेतरी लाकडाची मोळी पडलेली, एखाद पेरुच छोटस झाड व दुसऱ्या बाजूला हमखास शेवगा, जरासं अडगळीच लोखंडी साहित्य उभी केलेली बाज (चार पायांचा दोऱ्याचा पलंग).अस म्हटलं जातं की आंगण पाहून घर व माणसे कशी आहेत हे कळतं. किंबहूना बहुतांश अर्थी ते खरं ही वाटत. घरातील कित्येकांच्या वेगवेगळ्या आठवणी येथे भरलेल्या असतात.
सकाळचं होते ती आंगण शेणाने सारवल्यापासून...दोन तीन शेणाचे थाप्पे त्या त्या भागात पसरवले जातात लहान मुलांचा ब्रश तर या अंगणात सुरू होत असतो तोच डोळे मिटलेल्या अवस्थेत आजच्या सारखा ना बेसिन ना आरसा, थुंकण्यासाठी कंपाउंड बाहेर पिचकारी मारली की झालं. आज्जी मात्र त्या बंबा वरच्या पाण्याकडे लक्ष ठेऊन असायची व सगळ्यांचे आंघोळीला नंबर लावून द्यायची गरज वाटेल तसे लाकडं घातली जायची. तर एका कोपऱ्यात उखळ म्हणून गोल खड्डा असायचा त्यात साऱ्या चटण्या, दिवसभराची वाटणं, बारीक कुटून घ्यायचं काम चाललेलं असायचं. काही जी दिवसभराची धावपळ आहे ती याच अंगणात उठून दिसायची जस रोज दिवाळी दसरा असावा. नंतर ऐक ऐक काम हातावेगळ करताना घरातल्या कर्त्या स्त्री कडून तुळशीची नित्यनेमाने पूजा व्हायची तो डोक्यावर घेतलेला पदर पदर, भाळी लागलेलं ठसठशीत कुंकू या सात्विकतेने ती स्वतःसाठी काही न मागता ही माऊली आपल्या घरासाठी मात्र देवाकडे भरभरून मागायची. जसा दिवस वर यायचा तस उन्ह वर येऊन अंगणातील वर्दळ कमी व्हायची दुपारच्या जेवणासाठी आत मध्ये भाजी लावली जायची व बाहेर भाकऱ्या थापल्या जायच्या. व आज्जीचा वेळ मात्र घराच्या सावलीला बाजावर बसून तिच्या सुनेला मागदर्शन करण्यात व भावकितील उणेदूने सांगण्यात जायचा तेवढीच सूनबाईलाही काम करता करता करमणूक..वेशीवर आंगण असणाऱ्यांना मात्र एक फायदा हा की येता जाता बायका काय चाललंय या निमित्ताने ५-१० मिनिट बसायच्या त्या निमित्ताने एकमेकांशी विचारांची देवाणघेवाणही व्हायची शिक्षण कमी असल तरी त्या बोलण्यातून संवेदनशीलता स्पष्ट दिसायची. घरातून निघताना सवाष्ण बाईला चुकून लावायचं राहून गेलेलं हळदीकुंकू अंगणात लावलं जायचं. घरातल्या छोट्या मुलींचे रांगोळीचे प्रॅक्टिस सेशन या अंगणातच पार पडायचे.
गावात एखादी जत्रा असली की गावातली थोर मंडळी याच अंगणात फतकल मारून जत्रेच्या विषयीची खलबत व्हायची, एकमेकांच्या विचाराने याच सार प्लँनिंग व्हायचं. कुणी उभं राहून तर कुणी दोन पायावर आपलं धोतर सावरत बसायच. काहींचा शाब्दिक सहभाग नसला तरी हम्मम्म हम्मम म्हणून मूक सहभाग नक्कीच असायचा कारण या मिटिंगसाठी तंबाकुने भरलेला तोबरा फेकून देण्याइतपत दिलदारपणा त्या काळीही नसायचं. चला म्हणजे आजच्या आणि त्या काळात काहीतरी साम्य दर्शवणारी गोष्ट होती तर.
घरात काही लग्न, साखरपुडा, सुपारी फोडन, आनंदी कार्य असेल तर आंगण हेच मंगलकार्यालय असायचं चारी बाजूने चार बांबू उभारले की झाला मंडप व कंपाउंडबाहेर एक कढई व खालून रटरटनारा जाळ. कित्येक नववधू तर या अंगणाच्या साक्षीने आपल्या सुखी संसाराची स्वप्ने पहात प्रवेश करतात व या जागेत घेतलेला उखाणा हा आयुष्यभरासाठी पाठ झालेला असतो. अंगणातूनच सुनबाई!!! असा सासऱ्यांचा आलेला आवाज घरातील बायकांची त्रेधातिरपीट उडवण्यात पुरेसा असायचा कारण तो आदर भीतीपोटी नक्कीच नसायचा तर काळातील संस्काराने नकळत व सात्विक विचाराने झालेला असायचा.
कित्येक बायकांचे उन्हाळे या अंगणाने पूर्ण केलेले आहेत. पापड्या, कुरडया, वडे, शेवया वर्षभराच बरचस काम या अंगणात बसून व्हायचं व वाळवनासाठी या सारखी शेफ जागाही दुसरी नसायची हा आता अधूनमधून बारकाली पोर चोरून ते पदार्थ न्यायची हा भाग वेगळा व बाजेवर बसलेली आज्जी जोरात ओरडायची "अय गाबड्या, यिवं का तुझ्या घरला?" व हे आजीचं भारीतल तार सप्तकातल रागांवन पाहून सुनेलाही पदर तोंडाला लावून हसायचा मोह आवरायचां नाही पण त्यातही वेगळीच मजा असायची व त्यांच्या आयांना यावरून रागवायला एक आयत कोलीत आजीला मिळायचं पण ही भांडण म्हणजे दिवसभरापूरतीच असायची रात्री घरातल्या लहान मुलाकरवी वाटीत त्यांच्या घरी कालवन पाठवून गोड माघार घेतलेली असायची जणू काही बट्टी करण्यासाठी हे ऐकमेव कारणही असावं.
दिवाळीत एकमेकांच्या अंगणातुनचं फराळाच्या रेसिपीज समजून घेतल्या जायच्या. लहान मुलांना दुपारी कुठूनतरी विशिष्ट प्रकारचा आवाज यायचा केसांवर मिठाई, फुगे, बर्फाचा गोळा, कुल्फी व त्या माणसाला बोलावण्यासाठी अंगणात उंच उड्या मारून टाचा उंच करून हाथ हलवून त्याच लक्ष वेधून त्याला बोलावलं जायचं व तो आल्यावर आजीकडे चार आण्यासाठी मस्का मारला जायचा व आजी मात्र हळूच पदराआड हाथ घालून कुणाला दिसणार नाही या प्रकारे बरोबर साऱ्या सुट्ट्यां मधून चारच आणे काढून हे "फकस्त एवढ्या बार..." अस बजावून सांगायची. त्या पैशात मात्र ती स्वतःसाठी काही नाही करायची जे काय असेल नातवंडे, मुली या सर्वांसाठीच. मुलांच्या कित्येक उन्हाळच्या सुट्ट्या अंगणात गल करून गोट्या खेळण्यात गेल्या. कोया, लिंगोरचा, विटी-दांडू या खेळांनी आंगण नेहमी भरलेलं असायचं.
हिवाळ्यात रात्री हे आंगण अजून मोठं व्हायचं थंडी जास्त असल्याने लहान मुलांना आजूबाजूच्या काट्या कुटक्या आणायला सांगत व जेवण झाल्यावर सर्व त्या भोवती कोंडाळ करून बसत. या शेकोटीत मग कुणी पापाड्या भाजून खायचं तर कुणाचं शेंगा फोडून दोन दोन दाणे तोंडात टाकायचं काम करायचं, दिवसभर झालेल्या गोष्टीचा आढावा या शेकोटी मध्ये घेतला जायचा तिथे आजी व नातवंडे टीम वेगळी असायची कारण त्यांना तिच्या मांडीवर डोकं ठेऊन पडताना, रात्रीच्या अंगनाणातून चांदण्या मोजताना वेळ ही पुरत नसत तर कधी मुलांच्या आग्रहाखातर आजीच्या तोंडून एखादी तिने अनुभवलेली भुताची गोष्ट ऐकताना जाम वाट लागायची मग थोडी भीती जावी म्हणवून तिच्या सुरकुतलेल्या हातावर हात देऊन आपण एकटे नाही आहोत ही जाणीव करून घेतली जायची. व गोष्ट ऐकताना त्या अंगणात गोधडी घेऊन तिच्या कुशीत कधी झोप लागायची कळायच ही नाही.
आज हे आंगण आठवलं की असच वाटत की आजच जगणं हे पूर्ण असूनही अपूर्ण आहे. बंद फ्लॅटच्या मागे ही सारी सुखासीनता नक्कीच लोप पावलीये. शेजारधर्म हा फक्त वाढदिवसाची आमंत्रण देण्यासाठीच पाळला जातो ही शोकांतिका नाही का? अधेमधे बंद दारंही सजीव न वाटता फक्त चित्र भासतात मग हाच जिव्हाळा शोधण्यासाठी आज ठिकठिकाणी कृत्रिम रितीने बांधलेल्या फार्महाऊसची आपल्याला गरज पडते, हिवाळ्यात हुरडा पार्टी करून रोजच्या शहरी जीवनातून विसावा मिळवला जातो. पण या साऱ्यात ती अंगणाची मायेची ऊब प्रत्येक संकटात असणारा तो अप्रत्यक्ष रात्रीच चांदणं, तुम्ही व मी नेहमीच मिस करतोय.....
-प्रशांत तिवारी (-प्रति)
No comments:
Post a Comment