आज शनिवारचा सुट्टीचा दिवस असूनही सकाळपासून साईशची कसलीशी धावपळ चालू
होती. काय चाललं होतं ते मात्र कोणालाच समजत नव्हतं. पटठ्याने काकू कडून
गच्चीवरच्या खोलीची चावी घेतली व तिथल्या अडगळीच्या खोलीत त्याला हव्या
असलेल्या वस्तू शोधण्यात मग्न झाला. आई-बाबा ,आजी आजोबा, काका सगळ्यांनी
विचारून झालं होतं पण काही सांगेचना हे पाहून मोठ्यांनी ही जरासं दुर्लक्ष
केलं.
साईश आताशी चौथीत येऊ घातलेला अतिशय गोड मुलगा. लहानपणापासून
इंग्लिश मिडीयम मध्येच त्याच शिक्षण चालू होतं...घरामध्ये सगळ्यात शेंडेफळ
म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अगदी लहानपणापासून चौकस विचारांची साथ आणि
त्या प्रकारचं कुटुंब ही त्याला भेटेलेलं. प्रमोद आणि पूनम त्याचे आई-वडील
उच्चशिक्षित जॉब च्या निमित्ताने बाहेर असायचे अस असलं तरी साईश ची त्यांना
काही काळजी नसायची कारण आजी-आजोबा काका काकू प्रशांत आणि धनश्री यांच्या
सोबत तो छान रहायचा व रमायचा ही..
अगदी दृष्ट लागण्याऐवढं हे
मध्यमवर्गीय गोड अस कुटुंब..छानपैकी टुमदार घर व त्याच्या आजूबाजूस
त्याच्या आजोबांनी एक सुंदर बाग तयार केलेली होती त्यात आंबा, पपई,शेवगा,
पेरू अशी निरनिराळी फळ व भाज्यांची ही लागवड केली होती..
आजोबा
निवृत्त शिक्षक असल्याने तेच बागेची काळजी घ्यायचे त्यामुळे रोज पाणी
घालताना, खत पाणी, खड्डे करणं, कंपाउंड च काम बघणं हे सगळं करताना साईश
सगळ्या गोष्टींच बारकाईने निरीक्षण कारायचा त्यामुळे तो स्वतः निसर्गाच्या
खूप जवळ होता व ते संस्कार त्या वातावरणात राहिल्या मुळे नकळत त्याच्यावर
होत होते..
एव्हाना साईशकडून त्या अडगळीच्या खोलीतील सगळया सामानाची
उलथापालथ करून झाली होती..त्याला शेवटी हवा असलेला एक श्रीखंडाचा रिकाम
डबा व जुना कलरचा टिन चा डबा भेटला होता त्या साठी त्याला एक तार व छिद्र
पाडायला टोकदार अस हत्यार हवं होतं पण काही केल्या त्याला ते गवसेना..
जवळपास
अर्धा तास झाला त्याचा हा कार्यक्रम चालू होता कुठूनतरी त्याला एक टोकदार
खिळा भेटला तर त्याने त्या खिळ्याने त्या डब्याला छिद्र पाडायचा प्रयत्न
केला त्या साठी हवं असलेलं सार बळ त्याने दात ओठ खाऊन एकवटल पण त्या घाईत
छिद्र तर पडलं पण डब्याच्या आतून त्याच बोट होत तिथे तो खिळा लागला व
रक्ताची धार सुरू झाली. हातातील सार सोडून त्याने बागेमध्ये धूम ठोकली आता
मात्र तो खूप घाबरला होता वरून येतानाच काही रक्ताचे थेंब जमिनीवर पडले
होते आजी जवळच जपमाळ माळत असताना तिथे ते पाहिलं व कुणी बघायच्या आधीच तिने
ते पडलेले डाग पुसून खाली गेली व घडला प्रकार साईशच्या आई बाबांना न
सांगता आजोबा व प्रशांत काकाला सांगितला कारण साईशचे हे उद्योग घरातील
लोकांना नवीन नव्हते व काका व आजी आजोबांशी नात खूप जवळच होत त्यामुळे काही
चुकीचं घडलं तरी या लोकांकडून आपल्याला ओरडा बसणार नाही याची त्याला
पुरेपूर खात्री होती..
त्यामुळे आजीने धावत जाऊन काका व आजोबांना
घडला प्रसंग सांगितला व ताबडतोब फस्टेड बॉक्स ची पेटी घेऊन आजी आजोबा व
काका लगेच बागेत रवाना झाले. साईश तसा नाजूक दिसत असला तरी मनाने फार खंबीर
होता, त्याला लागलय याची भीती नव्हतीच पण हे आईला समजल्यावर जो नको असलेला
ओरडा खावा लागतो ते त्याला नको असायचं. हे तिघे तिथे पोहोचेपर्यंत साईश
नळाजवळ साऱ्यांना दिसला हे तिथे जायच्या आधीच त्याचे प्रथमोपचार सुरू झाले
होते ज्या बोटातून रक्त येत होतं ते बोट त्याने नळाखाली धरलं होत
काकाने
पटकन जाऊन त्याच्या रुमालाने त्याचा हाथ आधी स्वच्छ केला तो पर्यंत त्याची
टपोऱ्या डोळ्यांची नजर सगळ्यांवर एका मागे एक फिरत होती, त्याचा गोरापान
चेहरा जरासा सफरचंदा सारखा लालेलाल झाला होता आपण उद्योग करून या सगळ्यांना
काळजीत पाडलय हे समजलं होत..आजीचा जीव मात्र खालीवर होत होता त्याच्या
केसांवरून ती हाथ फिरवत होती व आजोबा पेटीतील कापूस व आयोडीन काढत होते
तोवर त्याच बोट साफ करून काका त्याच्या बोटावर फुंकर घालत होता आणि त्याला
थोडस ऐकवत ही होता..
"नाही जमत तर कशाला करायचे हे उद्योग?"
उत्तरा दाखल त्याच ही प्रतिउत्तर
"जमत मला सगळ मोठ्ठा झालोय आतां मी फक्त ते..ते...जरा किनई?
"असू दे काही नको बोलुस, प्रशांत ने त्याला गप्प केलं"
या गालफुग्याच्या उत्तराने आजीला ही हसू आवरलं नाही..
एवढं
बोलून तो गप्प झाला त्याच सिक्रेट त्याला कुणाला सांगायचं नव्हतं.. आताशी
त्याचा बोटांना कापूस लावून रक्त थांबवण्यात आलं होतं हलक्या हाताने काकाने
तिथे मलम लावून दिल व काका त्याच्या कामाला निघून गेला उन्हाळ्याचे दिवस
असल्याने सकाळी दहा वाजताच गरम व्हायला होतं होत..आजोबांना ही त्याच्या
चेहऱ्याकडे पाहून कीव आली व ते ही त्याच्या जवळ जाऊन बसले व आस्थेने
त्याच्या मऊ केसातून हाथ फिरवून त्याला विचारल "काय झालंय, सकाळपासून बघतोय
मी, मी काही मदत करू का? तरी ही स्वारी गप्पच..नुसत्याच हुंकाराने त्याने
नाही म्हणून मान डोलवली..
पण दुर्दैवाने खिडकीतून आईला हा प्रकार
सर्व लक्षात आला व नक्कीच कारट्याने काहीतरी उद्योग केलाय हे समजलं, तिने
खिडकीतूनच त्यांना आवाज दिला तसा आता साईश जागेवरून टुणकन उडाला व त्याची
नजर आता आजोबांवर होती कारण आई पासून वाचायचं म्हटल्यावर आजोबा नावाची ढाल
नेहमी पुढेच असायची त्यामुळे त्या नजरेतच आजोबांना काय समजायचं ते समजलं
त्यांनी साईशला कडेवर घेतलं व सवयीप्रमाणे गाल पुढे केला तशी चुटकीसरशी
साईश ने त्यांना गोड पापी दिली..आजी ही आजोबा पाठीमागे हॉल कडे चालते
झाले..
हॉल मध्ये जाताच आजोबांनी आजीकडे पाहून व हलकासा डोळा मारून मोठ्याने बडबड सुरू केली
"अग म्हातारे मुलंच ती..ती उदयोग नाही करणार तर आपण करणार का?
मूल देवाघरची फुल असली तरी त्यांना ही खरचटत, लागत, त्यात काय एवढं मोठं?
आणि आमचे साईश राव तर छोट्या बलाढ्य भिमाचे अवतार एवढ्याश्या लागल्याने तो थोडीच रडणार आहे..
आजी
फक्त त्यांना हुंकारा देत होती व साईश ची आई ही पहिलं आजोबांचं वाक्य सुरू
होण्या आधीच हातातल्या पोळ्या बंद करून पदर साडीला खोचून पुढे आलेल्या
केसांच्या बटांना सावरत किचनच्या बाहेर उभी होती..
तिच्या हातात
युद्धासाठी लाटणं नावाचं शस्त्र असलं तरी आजोबा नावाच्या ढाली पुढे ते
काहीच नव्हतं..ती ही दर वेळेस प्रमाणे यांना जाणून होती..ती ही कोपऱ्यात
छान उभी राहून गोड स्माईल देऊन आजोबांच नातवाच्या बचावासाठी सुरू झालेल
स्वगत ऐकत होती. तिला ही कळून चुकलं या दोघांच्या मध्ये पडायला च नको.. आता
आजोबांना ही तिची झालेली हार समजून ते ही गोड हसून युद्ध संपल्याची घोषणा
करतात..
साईश ही आता आई ने पुढे केलेल्या दोन हातांमध्ये जाऊन विसावन पसंद केलं..
आईने एवढंच विचारलं "दुखत नाही ना जास्त..?
त्याने अगदीच किरकोळ भाव व दोन्ही दंड वर करून चेहऱ्यावर हसू आणून सांगितलं
"अग, छे..हम तो बाहुबली है आई?"
याच्या उत्तराने पलीकडून प्रशांतचा आवाज
"बाहुबली, अगोदर चड्डी नीट घालायला शिका"
काकाच्या उत्तराने आजी आजोबा आई सारेच खळखळून हसतात.
आणि इकडे साईश डोळे मोठे करून जरा रागानेच आईच्या गळ्यात पडतो..
"बघ ना ग आई? काका कसा बोलतोय?
तेवढ्यात
प्रमोद ही तिथे येतो व साईश ला उचलून त्याचे खूप सारे पापे घेतो, जीव की
प्राण असतो तों त्याचा दिवसभर घरी नसल्याने साईश ची नि त्याची भेट कमीच
व्हायची पण सुट्टी असल्यावर मात्र तो शक्य तितका वेळ साईश साठी द्यायचा..
साईश ला कडेवर घेऊन..
"काका बरोबरच बोलतोय, खात नाही काही नाही नुसतं उंदडत असतोस इकडे तिकडे"
सकाळचे उपद्व्याप कानावर आलेत ह माझ्या..
"पप्पा पण मी नि ना काय नाही केल" पायजे तर आजोबांना विचारा?
हो की नाही हो आजोबा?
प्रमोद ने आजोबांकडे एक नजर देऊन डोळ्यानेच हसरा प्रतिसाद दिला..
"बर बर जा, आणि हे इनिंन मिनी नाही बोलायचं..शुद्ध मराठी बोलायचं..
खरतर प्रमोद ला ही माहीत होत साईश इतर मुलांसारखा उद्योगी नाहीये पण जर वडिलांचा धाक रहावा म्हणून जरा रागवायच नाटक..एवढंच काय ते..
त्याच अवस्थेत आई त्याला किचन मध्ये घेऊन जाते व जाताना साईश ही काकाला अंगठयाने वाकुल्या दाखवत आई सोबत आत जातो..
किचन मध्ये आल्यावर पूनम हळूच साईश ला विचारते,
काय रे बोक्या?? काय शिजतय डोक्यात..आला नाही शनिवार रविवार की तुझे उद्योग सुरू होतात..
'तस काही नाही ग आई, आपण तर फ्रेंड आहोत की मी तुला नाही सांगणार का?'
तसा साईश ने पाणी पिऊन तिच्या पदराला तोंड पुसलं..
तस पूनम ने लाडाने खाली बसून त्याचा एक गालगुच्चा घेतंला आणि म्हणाली,
'लबाडा,
मागल्या आठवड्यात बोरकर काकूंच्या बागेत आंबे पाडायला तुमची सगळी गॅंग
गेलेली नि त्या घरी नव्हत्या म्हणून जमलं आणि तुम्ही ही सोनू दादाला
चांगलाच म्हस्का लावला आणि कैऱ्या तोडून आणलेल्या..
आणि आता हे काय नवीन....
हे पूनम च वाक्य पूर्ण होताच साईश ने पटकन तीच्या गळ्यात हात टाकून जणू तिला गप्प राहायचाच आदेश दिला..
पूनम ला ही खूप कौतुक वाटलं तस तिने त्याच्या दोन गोबऱ्या गालावर पापे दिले.. तसा साईश तिची पकड सोडून किचन मधून बाहेर पळून गेला..
"हळूच जा रे, पळू नकोस हे आईच वाक्य ऐकण्यासाठी तो तिथे नव्हताच.."
वेडा कुठला... पूनम स्वतःशीच हसत.
हो का मग त्याचा बाबा ही वेडा असेल ना?
काय माहीत प्रमोद ने हे कुठं ऐकलं..तो बाहेरच उभा होता
'काहीतरीच तुमचं, अस लाजूनच ती तिच्या कामाला लागली'...
आणि काम करतानाच बोलून गेली, " आधी आंघोळ करून घ्या लवकर, आईला नाही आवडणार'...किती उशीर झालाय.
आईच
नाव ऐकताच त्याची नजर आईला शोधू लागली.. कारण घरात स्वच्छतेच्या बाबतीत
तिचा खूप दरारा होता..त्यामुळे घरात प्रमोद प्रशांत सोडले तर सगळे तिचे
नियम पाळायचे..
प्रमोद ही हसून हातातला लॅपटॉप सावरत हॉल मध्ये काम करू लागला..
'हो ग घेतो करून आंघोळ पाच मिनिटात'.
पूनम म्हणाली, 'हो समजल तुमचे पाच मिनिटं म्हणजे अर्धा तासच..'
आजोबांना
साईशचा स्वभाव माहीत होता त्यामुळे सकाळचा साईशने केलेला उद्योग तो
विनाकारण करणार नाही याची मात्र त्यांना पुरेपूर खात्री होती..पण काय होत
ते जाणून घ्यायच होत त्यांना..लहान मुलांची केमिस्ट्री ते चांगल्या प्रकारे
जाणून ही होते लहान मूल शाळेतल्या शिक्षकांवर खूप जास्त विश्वास ठेऊन
असतात..आजोबांच्या मित्राची सूनच साईशची वर्ग शिक्षिका असल्याने तिला फोन
करून विचारायचं अस ठरवलं..
जवळपास संध्याकाळ सहा ची वेळ अजून ही उणे
खाली नव्हती गेली बाकीची मंडळी आपापल्या कामात मग्न होती. सकाळचा झालेला
सगळा प्रकार साईश बऱ्यापैकी विसरला होता त्याला माहित होतं या वेळेस आजोबा न
चुकता त्यांच्या ग्रुप सोबत फिरायला बाहेर पडतात पण बागेच्या मोकळ्या
जागेत आजोबा मात्र बरचस जून साहित्य घेऊन बसले होते, साईश ला समजेना या
वेळी आजोबा घरी कसे?
तो थोड्या अंतरावरूनच ते करत असलेल्या कामाचा अंदाज
घेत होता पण त्याला काही उमजेचना. शेवटी न राहवून त्यांच्या पाठमोऱ्या
आकृती जवळ जाऊन हळूच त्याने दोन्ही हात प्रेमाने आजोबांच्या गळ्याभोवती
टाकुन प्रश्नांची सरबत्ती सुरू केली...
"आजोबा आज तुम्ही फिरायला नाही गेलात?"
"आणि हे सर्व तुटलेल्या वस्तू घेऊन काय करताय?"
"तुमचे फ्रेंड्स नाही का आले आज"?
"आणि तुम्ही....
हे साईश च वाक्य पूर्ण होण्याच्या आतच आजोबांनी साईशचे गळ्या भोवती असलेले हाथ अलगद काढून त्याला पुढे ओढून घेतलं आणि विचारलं
"अरे गद्धया मी काही तुमच्या रजनीकांतसारखा रोबोट आहे का की तुझ्या एवढ्या प्रश्नांना लगेच उत्तर देऊ?
रजनीकांत
च नाव येताच साईश ची कळी एकदम खुलली आणि तो खळखळून हसला तस आजोबांनीही
त्याच्या छोट्या हातावर टाळ्या देऊन त्याच्या हसण्यात सामील झाले..
साईश
आता आजोबां समोर असलेल्या मातीची कुंडी, छोटी तार, हातोडी, छोटे खिळे,
सफेद रंगाची डबी, ब्रश, सगळ्यांच डोळे मोठे करून निरीक्षण करत होता आणि
आजोबांनी हे लगेच हेरलं की हा कसला विचार करतोय..हाफ चड्डी घातलेल्या साईश
च्या भिरभिरत्या नजरेकड आजोबा खूप कौतुकाने पाहात होते.
आजोबांनी त्याला सांगायला सुरुवात केली की आता उन्हाळा आलाय तर सगळ्यांना तहान लागते की नाही?
साईश ने होकारार्थी मान डोलावली..
आपण
तर पाणी साठवून कधीही पाणी पिऊ शकतो पण ज्या चिमण्या, कावळे, छोटे
निरनिंराळे पक्षी आपल्या बागेत येतात त्यांचे पाण्यावाचून काय हाल होत
असतील?
म्हणून आपण त्यांच्यासाठी पाणी पिण्याचं भांड बनवून ते सावलीत झाडावर अडकवणार आहोत..
हे
ऐकताच साईशच्या डोळ्यातील चमक व आश्चर्य हे दोन्ही भाव आजोबांनी अचूक
टिपले होते..कारण शाळेत साईशच्या वर्ग शिक्षिकेने मुलांना हाच प्रोजेक्ट
दिला होता व प्रत्येकाचे फोटो वर्गातील डिस्प्लेबोर्ड वर लावण्यात येणार
होते त्यामूळे साईश चा सकाळपासून खटाटोप चाललेला. जास्त विषय न लांबता
आजोबांनी सांगितलं की मी दुपारी तुमच्या बाईंना फोन केला होता तर सगळं
समजलंय मला की घरातक्या बागेत चिमण्यांना पाणी ठेवायचा प्रोजेक्ट करायचा
होता तुला तर आता तुमचा हा प्रोजेक्ट आपण दोघे बनवणार आहोत, चालेल ना तुला?
साईश
ने आनंदाने उठून आजोबांच्या गालावर त्याच्या ओल्या ओठाणी पापी घेतली..तो
मनातच विचार करत होता आपण हे आजोबांना सकाळीच सांगितलं असत तर आजचा उद्योग
ही नसता घडला आणि बोटाला लागलं ही नसत..
हे सर्व विसरून तो त्यांना
त्यांच्या कामात मदतीला जुंपला, आजोबांनी छोटी पातळ तार पक्कड ने कापून
त्या मातीच्या छोट्या कुंडीच्या किनारीवर बांधून त्याला दोन -तीन वेढे दिले
कारण उंचावरून ते खाली पडू नये म्हणून.
साईश ही त्याच्या छोट्या
चिमुकल्या हाताने त्यांना मदत करत होता...आजोबांनी सांगितल्या प्रमाणे
त्याने छोटे खिळे शोधून त्यांच्या हातात दिले व आजोबांनी कुंडीच्या चार
बाजूला चार छोटे खिळे ठोकले त्यामुळे त्याला पंतगा सारख मंगळसूत्र
बांधण्यात आलं त्यायोगे ते फांदीवर छान ब्यालंन्स होणार होत आणि अर्ध्या
तासाच्या मेहनती नंतर त्यांचं पाण्याच परफेक्ट भांड तयार झालं होतं...
पण साईश च्या चेहऱ्यावर मात्र प्रश्न चिन्ह होते..
"आजोबा, सकाळी मी श्रीखंडाचा डबा घेऊन हे करणार होतो"
मग आपण यात इतका वेळ का लावला?
त्याचा बालप्रश्न साहजिक होता आजोबांनी त्याला सांगितलं,
"हे बघ, उन्हाळा सुरू झालाय आपण रोज आता फ्रीज मधील पाणी पितो की नाही नाहीतर माठामधील थंड गार पाणी.."
"तुझ्या प्लास्टिक च्या भांड्यात पाणी थंड राहील असत का"?
आता कुठे त्याच्या डोक्यात प्रकाश पडून त्याने पटकन डोक्यावर हाथ ठेऊन जीभ बाहेर काढली.
आजोबांना या अवतारात हे ध्यान खुप गोड दिसलं त्यांनी प्रेमानी त्याचे गालगुच्चे घेतले..
"चला आजोबा ठेऊयात आपण याला फांदीवर".
आजोबा
म्हटले आता संध्याकाळचे ७ वाजलेत चिमण्या त्यांची सोय करून आल्यात आता
लावून त्याचा उपयोग ही नाही होणार आपण उद्या सकाळी लवकर उठून त्यात थंड
पाणी टाकू.
साईशने हो बोलत आजोबांचा हाथ पकडत दोघे ही घराकडे चालते झाले.
मोठं युध्द जिंकून आल्याचा अविर्भाव होता साईश च्या चेहऱ्यावर..
आत
आल्यावर धनश्री काकू समोरच ऑफिसच काम करत होती सवयी प्रमाणे तो तिच्या जवळ
गेला नि तिच्या गालाला हाथ लावून काहीतरी तिला सांगायचा प्रयत्न करू
लागला,
"धनश्री ने ही तिच्या हातातलं काम टाकून त्याला जवळ ओढत विचारल, बोला काय सांगायचं आहे?"
आम्ही ना आज किनई....
तेवढ्यात आजोबांनी मागून येऊन त्याच्या तोंडावर हाथ ठेऊन धनश्रीला सांगितलं
"सुनबाई, हे आमचं सिक्रेट आहे आणि ते आम्ही तुम्हाला उद्या दाखवणार आहे".
तोवर साईश ने आजोबांचा हाथ स्वतः काढून तिरप्या मानेने वर पाहून आजोबांना हलकाच छानसा डोळा मारला..आजोबांनी ही संमती दर्शवली.
एवढं बोलून साईश ही तिच्या काकीला उद्या, उद्या म्हणून त्याने धूम ठोकत पळाला, धनश्री ही जाताना सांगायचं विसरली नाही
"अय लाडोबा, परत ये माझ्याकडे होमवर्क घेऊन मग बघते तुझा बेत"!
आजी ही तिकडून संध्याकाळची दिवेलागणी करून आरतीच ताट घेऊन येतच होती..
"धनश्री ने सांगून टाकल, आई उद्या आपल्याला बाबा आणि साईश कडून काहीतरी सरप्राईझ आहे हं.."
आईला हे सर्व काही नवीन नव्हतं ती गालातल्या गालात बाबांकडे हसून तिच्या कामाला निघून गेली..
इकडे
मात्र आज सकाळी साईश ला रोजपेक्षा लवकरच जाग आली होती कारण त्याला त्याची
उत्सुकता काही स्वस्थ बसू देईना..सगळ्यांनाच्या आधी नंबर लावत त्याने आंघोळ
वगरे करून स्वतःच टापटीपीने आवरलं होत सगळं झाल्यावर आजोबांच्या खोलीत
गेला तर आजोबांचे योगासन व प्राणायाम चालले होते तेवढ्या वेळात तो शेजारी
असलेल्या गँलरी मध्ये उभा राहिला की जेथून त्यांची बाग खूप छान दिसत होती..
सकाळचं
हे वातावरण त्याला नेहीमीच आवडायचं लहानपणापासून निरनिराळे प्रश्न विचारून
तो सर्वाना भंडावून सोडायचा अर्थातच ते सारे प्रश्न त्याच्या बालवयाला
साजेसे होते.. सकाळचे
६.३०
वाजले होते बाहेर दूधवाले काका, फुलवाले यांची रेलचेल सुरू झाली
होती...आजूबाजूचा पक्ष्यांचा चिवचिवाट वातावरणात गोडवा आणत होता, उन्हाळा
असूनही हवेतला वारा थोडा झोंबणारा होता.
"काय रे?
आज सुट्टी असूनही लवकर उठलास?"
साईश त्याच्या तंद्रीत असतानाच मागून आजीने त्याला आवाज दिला होत..
" अग तुला माहीत नाही का आमचं कालच सिक्रेट"?
मग तुझ्या आजीला नाही का सांगणार?
मी तुला नेहमी गोष्ट सांगते की नाही?
"मग मला सांगून टाक ना मी नाही फोडणार तुमचं भांड"..
साईश ल आजीच्या या म्हस्का मारण्याचं हसू आलं पण त्याने ते तिथेच कंट्रोल केलं..
त्याने उत्तर दिलं, "अग आजी, एवढी कसली तुला घाई"?
एका तासाचा तर प्रश्न आहे ना?
आणि सिक्रेट कुठे फोडतात का?
"माझ्या बर्थडे ला तुम्ही माझ्यासाठी जे सिक्रेट केलंत ते मला माहित होतं की?"
आता मात्र साईश च्या आवाजात मात्र नाराजी होती..
आजी स्वतःऊन साईश जवळ जाऊन तिने त्याच्या डोक्यावर हाथ फिरवून सांगितलं,
"बर बाबा, नाही विचारणार परत..पण मला समजायला हवे ह तुमचे उद्योग"
साईश ने नंदी बैलासारखी मान डोलावली..
आजीने
ही हसून मूक संमती दर्शवली आणि तिच्या कामाला लागली..साईश ची नजर ही आता
बागेत खिळली होती त्याच्या मनात विचारचक्र सुरूच होते कुठे आपल्याला
पाण्याची सोय करता येईल..कालपासून झालेल्या घटना त्याच्या डोळ्यासमोरून
तरळून गेल्या..मनात विचार केला
"आजोबा नसते तर हे काम झालं असत का?"
तेवढ्यात आजोबांनी त्याला हाक मारली "साऊ, चल यायचंय ना?"
साईशने पटकन त्यांना गोड स्माईल देऊन आजोबांच मनगट पकडल..
जवळजवळ सकाळचे ७ वाजले होते या तिघांशीवाय कुणी अजून उठलंच नव्हतं..
रविवार
असल्याने सुट्टीचा दिवस..त्यामुळे आज सगळे उशिराच उठायचे. बाहेर पडताना
हॉल मध्ये आजी माळ जात बसलेली होती तिला डिस्टब न करताच दोघे ही बाहेर
पडले..आजोबांनी गेल्या गेल्या थोडं निरीक्षण केलं साईश ही त्यांच्या
नजरेकडे पाहत होता त्यांना ही एव्हाना अंदाज आलेला की काय चाललंय
आजोबांच्या मनात..
हे माहीत असूनही साईशने त्यांना कंपाउंड च्या बाजूने
असलेल्या शेवग्याचं झाड सुचवलं पण बाजूने कंपाउंड असल्याने त्याला पाणी
ठेवण जमणार नव्हतं आणि बाहेर शेजारच्या मांजरी ही फिरत असायच्या त्यामुळे
तो विचार झटकून टाकला..काल ज्या ठिकाणी साईश लागल्यावर बसला होता त्या नळा
भोवती एक पेरुच ही झाड लावलेलं होत त्याच्या आसपास तिन्ही साईडने छान
प्रकाश होता व दाट पेरूच्या झाडात एका बेचकी मध्ये त्यांना पाणी ठेवायला
जागा होती जवळपास हे काम होत आलं होतं...आजोबांनी घाईने काल तयार केलेलं
मातीची कुंडी साईश ला जवळ ठेवायला सांगितली..तो पर्यंत आजोबांनी सुतळीला
त्यांच्या उंचीएवढ्या जाड अश्या फांदीवर तिला ४ पदरी करून बांधलं तिला छान
गाठ मारून पक्क झाल्याची खात्री करून घेतली नंतर खाली ठेवलेली कुंडी घेऊन
तिला खालच्या तळाला एक पात्तळ प्लायवूड लावलं व छोट्या खिळ्याने ठोकळ व तो
प्लायवूड चा चौकोनी तुकडा असा होता की त्याच्या भोवताली २
से.मी.ची कड होती...
हे सर्व पहाताच साईश म्हणाला,
"आजोबा हे तर आपल्या प्लॅन मध्ये नव्हतं तर हे काय?
"आजोबा म्हणाले, साऊ बेटा शाळेत जरी पाणी ठेवायच भांड सांगितलं असेल तरी आपण अजूनही काहीतरी Add करणार आहोत बघशीलच तू"
साईश थोडा संभ्रमात पडला पण त्याला छान वाटलं काहीतरी अजून भारी होणार म्हणून ...
बऱ्यापैकी
सार काम होत आलेलं घड्याळाचा काटा सरकत होता व सूर्याची कोवळी किरणे बागेत
येत होती आणि बाजूला नळातून टपकणाऱ्या पाण्याचे ओघळ खाली येऊन ओलावा
निर्माण झाला होता तर एकदोन चिमण्या त्यात आपली तहान शमवण्याचा प्रयत्न करत
होत्या...आता तर घरातले सगळे उठून त्याची ही दिनचर्या सुरू झाली
होती..इकडे यांची ही साऱ्यांना सरप्राईज द्यायची वेळ जवळ आली होती..
आजोबांनी
हळूच दोन्ही साईडने अडकवलेल्या खिळ्यात त्या सुतळीचे टोक बांधून ते करकचून
बांधले व नंतर उरलेल्या दोन बाजूने ही आता मात्र चारी साईडने यांचा
ब्यालन्स झाला होता..आणि आता हकुच त्यांचा शर्ट च्या खिशातून त्यांनी
कसलीशी पुरचुंडी काढून ती खाली ठेवली व म्हणाले,
"साईशराव आणा आता पाणी"..
साईश
ने पटकन तिथे असलेला जग साफ केला व त्यात नळ चालू करून पाणी टाकलं, हळूच
धावत पाणी न सांडता त्याने आजोबांना दिल पण कारण की त्याची ऊंची कमी
असल्याने त्याचा हाथ तिथे पूरला नसता तर आजोबांनी त्याच अवस्थेत त्याला
कडेवर घेतले व हळूच त्यात पाणी टाकायला सांगितलं, साईश ला आपण काहीतरी खूप
मोठ्ठ काम केल्याचा फील येत होता कुंडी पूर्ण भरून जाऊन थोडं पाणी ही
सांडलं तस साईशला त्यांनी खाली उतरवलं..
"आजोबा त्या कागदाच्या पुडीत काय आहे"?
उत्तरादाखल
आजोबांनी खाली वाकून ती पुडी उघडली व साईश समोर अलगद उघडली तर त्यात खूप
सारे तांदळाचे दाणे, ज्वारी, बाजरी, गहू, असे खूपसे एकत्र केले होते. साईश
च्या छोट्या जीवाला काही समजेना हे काय आहे म्हणूंन..
"त्याच काय
आहे बेटा, तुम्हाला शाळेत फक्त पाणी ठेवायचं भांड सांगितलेलं पण आपण
त्यांची इथे खाण्याची सोय पण केलीये"...मघाशी जो प्लायवूड लावला होता तो
याच कारणासाठी की आवण तिथे हे सारं धान्य राखुन देऊयात म्हणजे छोटे पक्षी
ते खातील ही आणि पाणी ही पितील
"आहे की नाही मज्जा"?
साईश ने
हसून आजोबांच्या हातावर टाळी दिली व त्याच्या आजोबांकडे मोठ्या कौतुकाने
पाहू लागला..आज त्याला त्याच्या आजोबांचा खुप अभिमान वाटत होता.
पटकन
आजोबांनी त्याला त्या पुरचुंडी सोबत उचललं व हळूच ते सर्व दाणे त्या
प्लायवूड भोवती टाकून दिले..जवळपास त्या छोट्या पट्टी पर्यन्त ते पूर्ण
भरून गेलेलं..आता कुठे साईश चा जीव भांड्यात पडला होता ..जवळपास सकाळचे
८.३० झालेले..
आजोबा म्हणाले आता आपल्याला इथून जायला हवं..आपण इथे असू तर पक्षी यायला घाबरतील...
हे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच साईश पळत पळत पुढे जाऊन थांबला आजोबांना मात्र त्याच्या या समंजसपनाच कौतुक वाटत होतं..
तिथेच
लाकडी जुनी खुर्ची होती ती घेऊन आजोबा बसले व साईश त्यांच्या मांडीवर..
तोवर यांचं सरप्राईझ काय हे आतापर्यंत साईशच्या आईला किचनमधून लक्षात आलं
होतं Actually तिच्यासाठी हे सारं अनपेक्षितच लगेच तिने प्रमोद ला हाक
मारून त्याला ही खाली बोलावून घेतलं व आजीने धनश्री व प्रशांतला.. सर्व
विचारत होते
"कशाला एवढ्या घाईने बोलावलंय ग?"
आजीने सर्वाना शु...करून गप्प बसवलं व फक्त आजोबा व साईश बसले होते तिकडे बोट केलं..
अगोदर त्यांना समजेचना नंतर हळूच आवाज न होता ते ही बागेत जाऊ लागले व थोड्या अंतरावर उभं राहून सारा नजारा न्याहाळू लागले..
एव्हाना चिमण्या पेरूच्या झाडाभोवती घिरट्या घालत होत्या..
"आजोबा ssssss... "
त्यांनी
लगेच साईश च्या तोंडावर हाथ ठेऊन त्याला हातानेच गप्प राहण्याचा इशारा
केला..तस त्याला समजल आपण आवाज केला तर त्या उडून जातील..
मागून
लगेच पूनम ने जाऊन आतून हँडीकॅम आणून प्रमोद कडे दिला त्याने क्षणाचाही
विलंब न करता ते सर्व क्षण टिपायला सुरुवात केली..आजी, धनश्री ,प्रशांत,
पूनम सर्व जण मागे उभे राहून हे दृश्य पाहण्यात गुंग झाले होते..
तितक्यात
तिथे दोन चिमण्यां आल्या अगोदर त्या झाडावर बसल्या आजूबाजूला निरखून पाहत
होत्या..साईश ची उत्सुकता शिगेला पोहचली होती की कधी त्या पाणी
पितील..त्यातल्या एकाने उडून आजूबाजूला गिरकी घेतली व काहीतरी बोलायच्या
बहाण्याने त्या दोघांचा चिवचिवाट झाला..त्यांच्यातला तो गोड संवाद तिथल
वातावरण प्रसन्न करून जात होता..तितक्यात एक चिमणी त्या मातीच्या कुंडीवर
एकदाची बसली.. तसा साईश ने आपला हात हातात आजोबांच्या हातात आनंद होऊन हळूच
प्रतिसादा दाखल दाबला..
तसा प्रमोद ही जरा पुढे होऊन एका कोपऱ्यातून
यांच झूम करून शूटिंग काढू लागला..एक चिमणी आली म्हटल्यावर दुसरीही आली आता
आजूबाजूला नजर फिरवून दोघेही त्यांच्या छोट्याश्या इवल्याश्या चोचीमधून
पाणी पीत होत्या..त्याच कुंडीवर इकडे तिकडे उडयाही मारू लागल्या तश्या त्या
पटकन खाली येऊन तिथले दाणे ही वेचायला लागल्या..
ते पाहताच
सगळ्यांच्या ओठावर हसू फुटलं.. आजोबा ही साईश च्या डोक्यावरून हाथ फिरवून
त्याला गोड स्माईल देत होते दोघांच्या ही डोळयात आनंद जणू तरळत होता..त्या
चिमण्यांनी नंतर कुंडीत जाऊन पंख ही ओले करायला सुरुवात केली..
फक्त
आजोबा इथे असूनही हा आनंद अपुरा की काय त्याने पटकन खाली उडी घेऊन मागे
वळून पाहिलं तर त्याला सगळे तिथे हजर असलेले दिसत होते आवाज न होता तो
सर्वांसमोर गेला आजीने जवळ घेऊन त्याची पापी घेतली.. एव्हाना चिमण्या उडून
गेल्या होत्या..नंतर सर्वांनी हॉल मध्ये बसून तो विडिओ टीव्ही वर बघितला
खुप छान दृश्य होत ते..साईश आजी आणि काकू च्या मांडीवर बसला होता व डोळ्यात
साठवून ते सारं पाहत होता..माणसांसारखं पशु पक्ष्यांचं ही छोटस जग असत हे
नकळत रुजलेले संस्कार कुठल्या पुस्तकातून मिळणार नव्हते..प्रमोद आणि पूनम
ही या साईशच्या आनंदासाठी आजोबांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे भाव आणून नकळत
त्यांचे आभार मानत होते पाणावलेल्या डोळ्यांनी..नोकरी करता करता आपल्या
मुलांवर संस्कार करण्यासाठी आजी आजोबा घरातील मंडळी ही मोठी विद्यापीठ
असतात याची जाणीव खुप कमी पालकांना असते व ही जाणीव या दोघांना होती..ही
जाणीव आज समाजात असती तर कदाचित वृद्धाश्रमाचा जन्म नसता झाला..अगदी छोटीशी
गोष्ट असली तरी भावना जास्त महत्वाची आहे..
मुलांना निसर्गा विषयी
किंवा कुठल्याही कलेची ओढ असंण यासाठी घरातल वातावरण मोठ्या प्रमाणात
जबाबदार असत..पण या कुटुंबाच्या सहवासात वाढणारा साईश खरंच शंभर मुलांमध्ये
भाग्यवान होता की ज्याला भावनिक दृष्टीने घडवायची गरज नव्हती तर तिथल्या
वातावरणात तो आपोआप घडत होता..साईश या कुटुंबातली दुधावरची साय असला तरी
त्याच भावनाविश्व इतरांच्या तुलनेत खूप प्रगल्भ होत त्याला कारणीभूत त्याचे
आजी-आजोबा होते.. मातीला मडक्याचा आकार देण्यासाठी कुंभाराच कौशल्य ही
वाखानण्यासारखं असत..कदाचित साईशवर प्रेम करणारे सारेच कौशल्य विकसित
असणारे आजच्या वर्तमान काळातले निष्णात कुंभार होते..
चिमण्यांचा
प्रोजेक्ट ही पार पडला होता व त्यांना ही त्यांची रोज काळजी घेणार एक
हक्काचं घर सापडलं होत की ज्यांना तिथे कुणी ही हुसकावून न लावता प्रेमच
प्रेम देणारी माणसं होती..
-प्रशांत तिवारी (-प्रति)